दुबई - दिल्ली कॅपिटल्सचे अमित मिश्रा आणि इशांत शर्मा हे दोन अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामातून बाहेर पडले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील दुखापतीमुळे पुढील काही सामने खेळणार नाही. अशात दिल्लीच्या आणखी एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. यामुळे दिल्लीच्या संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान अय्यरचा खांदा दुखावला गेला. त्यामुळे त्याने मैदान सोडले. यानंतर शिखर धवनने संघाचे नेतृत्व केले. राजस्थानवर विजय मिळवल्यानंतर शिखर म्हणाला, अय्यरला वेदना होत आहेत. त्याच्या दुखापतीबाबत गुरूवारी काय ते समजेल. त्याला खांदा हलवता येत आहे. प्रार्थना करतो की, त्याची दुखापत गंभीर नसावी.
दरम्यान, याआधी दिल्लीचे अमित मिश्रा आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडले आहेत. तर पंत देखील दुखापतीमुळे पुढील काही सामने खेळणार नाही. अशात जर अय्यरची दुखापत गंभीर असल्यास, हा दिल्लीच्या संघासाठी मोठा धक्का असणार आहे. दिल्ली संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी ८ सामन्यात सहा विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांचा पुढील सामना १७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
हेही वाचा - दिल्लीच्या एनरिकने फेकला IPL च्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू
हेही वाचा - ट्रायलसाठी फलंदाजांची रांग पाहून गोलंदाजांच्या रांगेत उभारला, अशी आहे तुषार देशपांडेची 'जर्नी'