अबुधाबी - आयपीएलचा अकरावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर १५ धावांनी विजय मिळवत आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले, तर दिल्लीचा या हंगामातील हा पहिला पराभव ठरला. हैदराबादच्या १६३ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ २० षटकांत ५ बाद १४७ धावा करू शकला. हैदराबादच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांवर वर्चस्व राखत ही कामगिरी केली. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान हा या सामन्याचा मानकरी ठरला.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली. सलीमीवीर पृथ्वी शॉ ला पहिल्याच षटकात गमावले. भुवनेश्वरने त्याला बाद केले. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. धवन ३४ धावांवर (४ चौकार) तर श्रेयस अय्यर १७ धावा (२ चौकार) काढून बाद झाले. या दोघांना फिरकीपटू राशिद खान याने माघारी धाडले. रिषभ पंत (२८) आणि हेटमायर (२१) यांनी जलद खेळी केली. मात्र, हे दोघे फलंदाज बाद झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांना आव्हानांपर्यंत पोहोचणे कठीण झाले. हैदराबादकडून राशिद खानने १४ धावांमध्ये ३ तर भुवनेश्वर कुमारने २५ धावात २ आणि खलील अहमद आणि नटराजनने प्रत्येकी १ बळी घेतला. या सामन्यात टी. नटराजनची शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने ४ षटकांत फक्त २५ धावा दिल्या.
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला १६२ धावांवर रोखले. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संयमी पद्धतीने डावाची सुरुवात केली. या दोघांनी ७७ धावांची सलामी दिली. वॉर्नरने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. वॉर्नरनंतर आलेला मनीष पांडे ३ धावांची भर घालून माघारी परतला. या दोघांना फिरकीपटू अमित मिश्राने बाद केले.
आज केन विल्यम्सनने आयपीएलच्या तेराव्या पर्वात प्रथम फलंदाजी केली. त्याने जॉनी बेअरस्टोला हाताशी घेत संघाची धावगती वाढवली. बेअरस्टोने ४८ चेंडूत अर्धशतक केले. तर, विल्यम्सनने २६ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा केल्या. कगिसो रबाडाने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत दोघांना बाद केले. त्याने ४ षटकात २१ धावा देत २ मोहरे बाद केले. आज पदार्पण केलेला जम्मू काश्मीरचा १८ वर्षीय अब्दुल समदने १ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १२ धावा केल्या.
LIVE UPDATE :
- सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर १५ धावांनी विजय
- खलील अहमदने पटकावली अक्षर पटेलची विकेट
- अक्षर पटेल ६ चेंडूत ५ धावा काढून बाद
- टी. नटराजनच्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिस पायचीत
- मार्कस मार्कस स्टॉइनिस ९ चेंडूंत ११ धावा काढून बाद
- पंत २८ धावांवर बाद, राशिदचा तिसरा बळी.
- दिल्लीला विजयासाठी २४ चेंडूत ४९ धावांची गरज.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- पंतची संयमी खेळी.
- दिल्लीला २८ चेंडूंत ५८ धावांची गरज.
- हेटमायर २१ धावांवर माघारी. भुवनेश्वरने केले बाद.
- दिल्लीला ४२ चेंडूत ८५ धावांची आवश्यकता.
- शिमरॉन हेटमायर मैदानात.
- शिखर धवन ३४ धावांवर बाद, राशिद खानने धाडले माघारी.
- दिल्लीला विजयासाठी ६० चेंडूत ११० धावांची गरज
- दहा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ५४ धावा.
- ऋषभ पंत मैदानात.
- दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर १७ धावांवर माघारी, राशिद खानने केले बाद
- पाच षटकानंतर दिल्लीच्या १ बाद २७ धावा.
- श्रेयस अय्यर मैदानात.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या १ बाद २ धावा.
- पृथ्वी शॉ २ धावांवर माघारी, भुवनेश्वरला मिळाला बळी.
- भुवनेश्वर कुमार टाकतोय हैदराबादसाठी पहिले षटक.
- दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात.
- २० षटकात हैदराबादच्या ४ बाद १६२ धावा.
- रबाडाच्या षटकात ४ धावा.
- अभिषेक शर्मा मैदानात.
- विल्यम्सन शेवटच्या षटकात बाद. २६ चेंडूत ४१ धावांवर विल्यम्सन झेलबाद.
- कगिसो रबाडा टाकतोय २०वे षटक.
- १८ षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद १४५ धावा
- अठराव्या षटकात रबाडाने दिल्या फक्त ५ धावा.
- जम्मू काश्मीरचा १८ वर्षीय फलंदाज अब्दुल समद मैदानात
- बेअरस्टो ५३ धावांवर बाद. रबाडाने धाडले माघारी.
- बेअरस्टोचे ४४ चेंडूत अर्धशतक. खेळीत २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- सतरा षटकानंतर विल्यम्सन २१ चेंडूत ३८ धावांवर नाबाद.
- सतराव्या षटकात विल्यम्सनचे स्टॉइनिसला सलग दोन चौकार.
- बेअरस्टोची संयमी खेळी.
- जॉनी बेअरस्टो अर्धशतकाजवळ.
- पंधरा षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ११७ धावा.
- केन विल्यम्सन मैदानात.
- मनीष पांडे ३ धावांवर बाद, मिश्राचा दुसरा बळी.
- दहा षटकानंतर हैदराबादच्या १ बाद ८२ धावा.
- मनीष पांडे मैदानात.
- अमित मिश्राने वॉर्नरला केले बाद.
- हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ४५ धावांवर माघारी.
- पाच षटकानंतर हैदराबादचा पहिला षटकार.
- वॉर्नर १८ चेंडूत १५ तर, बेअरस्टो १२ चेंडूत ८ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद २४ धावा.
- हैदराबादची संथ सुरुवात.
- पाचव्या षटकात दिल्लीचा डीआरएसचा निर्णय चुकला.
- डेव्हिड वॉर्नरकडून सामन्याचा पहिला चौकार.
- पहिल्या षटकात हैदराबादच्या बिनबाद ९ धावा.
- इशांत शर्मा टाकतोय दिल्लीसाठी पहिले षटक.
- हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो मैदानात.
- नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग XI -
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, मार्कस स्टॉइनिस, अमित मिश्रा, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्ट्जे.
सरायझर्स हैदराबादची प्लेईंग XI-
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, राशिद खान, खलील अहमद, टी. नटराजन, प्रीयम गर्ग, अब्दुल समद.