दुबई - सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने दहा गडी राखून दमदार विजय मिळवला. रविवारी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर मोठा विजय साकारला. चेन्नई एक्सप्रेस विजयी रुळावर आल्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निश्वास सोडला. दरम्यान, सामना संपल्यानंतर विजयासाठी केलेला खटाटोप धोनीने सांगितला.
सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला की, 'पंजाबला कमी धावांमध्ये रोखणे महत्वपूर्ण ठरले. पहिल्या चार सामन्यातील अनुभव पाहता, आम्ही कमीत कमी धावांमध्ये पंजाबला रोखण्याची रणणिती आखली होती. सर्व संघांकडे आक्रमक फलंदाज आहेत. जे कोणत्याही गोलंदाजाला फोडून काढू शकतात. पण पंजाबविरुद्धच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.'
मला वाटत की, आम्ही लहान-लहान बाबी योग्य पद्धतीने हाताळल्या. ते आमच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. फलंदाजीमध्ये आम्हाला ज्या पद्धतीतने सुरूवात हवी होती, ती आम्हाला मिळाली. आम्हाला आशा आहे की, अशीच कामगिरी पुढील सामन्यात देखील करू, असेही धोनी म्हणाला.
शेन वॉटसनने शानदार अर्धशतक झळकावले. यावर धोनी म्हणाला, वॉटसनने नेटमध्ये अधिक श्रम घेतले होते. त्याने खेळपट्टीवर ते दाखवून दिले. प्रत्येक वेळेला आक्रमक फलंदाजी करण्यापेक्षा खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे असते. वॉटसनने तेच केले. चेन्नईसाठी सातत्याने धावा करणाऱ्या डू प्लेसिसविषयी धोनी म्हणाला, फाफ आमच्यासाठी अॅकरची भूमिका निभावत आहे. तो मधल्या षटकात चांगले फटकेही लगावतो. लॅप शॉटच्या मध्यमातून तो गोलंदाजाला नेहमी भ्रमित ठेवतो.
दरम्यान, चेन्नई संघाला तीन पराभवानंतर विजयाची चव चाखता आली. चेन्नईचा पुढील सामना ७ ऑक्टोबरला कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.
हेही वाचा - RCB VS DC : कुशल श्रेयससमोर अनुभवी विराटचे आव्हान; आज चॅलेंजर्संशी कॅपिटल्स भिडणार
हेही वाचा - MI vs SRH : मुंबईची हैदराबादवर ३४ धावांनी मात, गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप