अबू धाबी - मागील आठवडा चेन्नई सुपर किंग्जसाठी वेदनादायी ठरला. कारण सीएसकेचे २ खेळाडूंसह आणखी ११ जण कोरोनाबाधित आढळले. यामुळे संघाचा क्वारंटाइन कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात आला. आता सीएसकेच्या खेळाडू आणि सहाय्यक सदस्यांची पुन्हा नव्याने कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सीएसकेचा संघ यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टापची चाचणी करण्यात आली. यात १३ जण कोरोनाबाधित आढळून आले. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचा यात समावेश होता. त्यामुळे सीएसकेचा क्वारंटाइन कालावधी एक आठवड्यांनी वाढवण्यात आला. सोमवारी पुन्हा सर्व सदस्याची चाचणी करण्यात आली. यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती संघाचे सीईओ के. एस विश्वनाथन यांनी दिली.
दरम्यान, सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा ३ सप्टेंबरला चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून सराव सत्राला सुरूवात केली जाणार आहे. पण दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना मात्र प्रशिक्षण शिबिरात दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिरात येण्यास त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
आज सकाळीच सीएसकेचे दोन खेळाडू अबूधाबीमध्ये पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे डु प्लेसिस आणि लुंगी एनगिडी हे युएईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना सहा दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या दरम्यान त्यांची पहिला, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी चाचणी केली जाणार आहे. यात ते निगेटिव्ह आढळले तर त्यांना सरावासाठी परवानगी दिली जाणार आहे.