मुंबई - देशात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये होत आहे. स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघानी तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर काही संघ युएईमध्ये दाखलही झाले आहेत. याच दरम्यान, बीसीसीआयने खेळाडूंना एक खमकी 'वॉर्निंग' दिली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'आयएएनएस’शी बोलताना सांगितले की, 'युएईमध्ये जैव सुरक्षित बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणीही गरज नसताना भटकत बसू नये, अशी सक्त ताकीत खेळाडूंसह प्रशिक्षक, संघमालक आणि इतर सहकाऱ्यांना देण्यात आली आहे. कारण एका व्यक्तिच्या चुकीमुळे इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते. ही बाब व्यवस्थापन खपवून घेणार नाही.'
जैव सुरक्षित बबलमध्ये खेळाडूंची सर्व काळजी घेतली जाणार आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा त्यांना पुरवल्या जातील. त्यामुळे संघमालकांनी देखील जैव-सुरक्षित बबल सोडून इतरत्र भटकू नये, अशी तंबी सर्वांना देण्यात आली असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएल स्पर्धेचे आयोजन हे अनेक अडथळ्यांना पार करुन करण्यात येत आहे. यासाठी सर्वानांच कठोर परिश्रम घ्यावे लागले आहेत. अशात एका व्यक्तिच्या चूकीचे परिणाम सर्वांना भोगावे लागू नये, यासाठी कडक नियम तयार करण्यात आले असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आज सकाळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ युएईमध्ये दाखल झाला आहे.
हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू कोरोनाबाधित
हेही वाचा - धोनीनं मारलेला षटकार जिथे पडला, ते आसन राखीव ठेवण्याची एमसीएकडे विश्वस्ताची मागणी