मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान त्याची दुखापत गंभीर असल्यास, इंडियन प्रीमियर लीगच्या १३ हंगामातून त्याला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास किंग्स इलेव्हन पंजाबसाठी हा मोठा धक्का आहे.
बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेलच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यात वेदना होत होत्या. तेव्हा त्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या वैद्यकीय टीमला सांगितले. वैद्यकीय टीमने त्याच्या हाताची तपासणी केली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्या टीमने सांगितले. मॅक्सवेलला या दुखापतीतून सावरण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली. त्यामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून मॅक्सवेलच्या जागी डार्सी शॉर्टचा समावेश ऑस्ट्रेलियाच्या संघात करण्यात आला आहे.
आफ्रिका दौऱ्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -
अॅरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मिशले मार्श, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, शेन अॅबॉट, अॅशटोन अगर, अॅडम झम्पा, अॅलेक्स कॅरी, जे. रिचर्डसन आणि डार्सी शॉर्ट.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलसाठी १०.७५ कोटी रुपये मोजले आहेत.
दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने बिग बॅश लीगच्या माध्यमातून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. बिग बॅश लीगमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. पण तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही.
हेही वाचा -
टीम इंडियाला नमवून ऑस्ट्रेलियाने जिंकली तिरंगी मालिका, स्मृतीचे अर्धशतक व्यर्थ
हेही वाचा -