सिडनी - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय संघाला नियोजित वेळेपेक्षा एका षटकाचा जास्त वेळ घेतल्याबद्दल दंड ठोठावला.
आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडू व खेळाडूंच्या सहकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे, जे षटकाच्या कमी गतीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. अशामध्ये खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड आकारण्यात येतो. कारण त्यांना निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण करता आली नाही. विराटने ही चूक स्वीकारली आहे.
हेही वाचा - दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला कोरोनाची लागण
मैदानावरील पंच रॉड टकर, सॅम नोगाज्स्की, टीव्ही पंच पॉल रायफेल आणि चौथे पंच जेरार्ड एबूद यांनी भारतीय संघावर हे आरोप लावले होते. हे योग्य ठरले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कॅनबेरा येथे २ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.
स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्कार -
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावा करता आल्या. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मिथने ६६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावा केल्या.