कोची - ''मला बोलवा, मी येईन आणि कुठेही क्रिकेट खेळेन'', असे भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतने म्हटले आहे. श्रीशांतवरील स्पॉट फिक्सिंगसाठी असलेली सात वर्षांची बंदी रविवारी संपुष्टात आली. श्रीशांतवर आजीवन क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. परंतु या निर्णयाच्या विरोधात त्याने कायदेशीर लढा दिला. या बंदीच्या समाप्तीनंतर श्रीशांतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीशांत म्हणाला, "मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका येथील एजंटशी चर्चा करत आहे. मला या देशांमध्ये क्लबस्तरीय क्रिकेट खेळायचे आहे. २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये मला देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. शिवाय, लॉर्ड्समधील एमसीसी आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील सामन्यात खेळणे ही माझी दुसरी इच्छा आहे."
बंदी संपल्यानंतर स्थानिक क्रिकेट खेळण्याची इच्छा श्रीशांतने यापूर्वीच व्यक्त केली आहे. शिवाय, आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास श्रीशांतचा नक्की विचार केला जाईल, असे केरळ राज्य क्रिकेट संघाने सांगितले आहे.
श्रीशांत टी-२० आणि एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. २०११ वर्ल्ड कपपासून तो भारताकडून खेळलेला नाही. २००५मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्या आहेत.