नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय 'टी-२०' क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहने पहिले स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या नावावर होता.
हेही वाचा - टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅनचा कोहलीला धोबीपछाड
कुलसेकराने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट कारकिर्दीतील २०५.१ षटकांपैकी ६ षटके निर्धाव टाकली होती. तर, बुमराहने १७९.१ षटकापैकी ७ षटके निर्धाव टाकली आहेत. न्यूझीलंडच्या डावाच्या दुसर्या षटकात त्याने एकही धाव दिली नाही. शिवाय, त्याने या षटकात मार्टिन गप्टिलला बादही केले होते. भारताच्या विजयात बुमराहने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने सामन्यात ४ षटकांत १२ धावा देऊन तीन बळी घेतले.
या क्रमवारीत, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग तिसर्या क्रमांकावर आहे. टी-२० मध्ये त्याने ५ षटके निर्धाव फेकली आहेत. २८ सामन्यात १०२ षटके गोलंदाजी करुन हरभजनने हा विक्रम केला होता.