मेरठ - भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याचे सासरे अनिल कुमार यांचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून धक्कादायक मृत्यू झाला आहे. ही घटना, रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, रविवारी सकाळी अनिल कुमार पुदिन्याची पान तोडण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले होते. तेव्हा झालेल्या पावसाने ती जागा निसरडी बनली होती. तेव्हा त्याचा पाय घसरुन ते तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले. अपघात झाल्यानंतर त्यांना तत्काळ केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
सासरे अनिल कुमार यांच्या अपघाताची माहिती मिळताच प्रवीण कुमार रुग्णालयात पोहोचला होता. अनिल कुमार हे सेवानिवृत्त हवालदार होते.
दुखापतीने ग्रस्त झालेल्या प्रवीण कुमारने २०१८ मध्ये आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपला शेवटचा सामना २०१२ मध्ये पाकिस्तान विरुध्द खेळला आहे. प्रवीण कुमारने भारताकडून ६८ एकदिवसीय सामने खेळली असून यात त्याने ७७ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने ६ कसोटीत २७ गडी आणि १० टी-२० सामन्यात ८ गडी बाद केले आहेत.