नवी दिल्ली - २०२० हे वर्ष कोरोनामुळे गाजले. या विषाणूमुळे क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसला. त्यात क्रिकेटच्याही मालिका रद्द आणि स्थगित करण्यात आल्या. मार्चमध्ये सुरू होणारे आयपीएल सप्टेंबरपासून खेळवण्यात आले. मात्र ही सर्व कसर आता २०२१ मध्ये भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील 'पॉवरपॅक' कार्यक्रम जाहीर केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप संघाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, वृत्तानुसार, २०२१ मध्ये भारतीय संघाला १४ कसोटी, १६ एकदिवसीय सामने आणि २३ टी-२० सामने खेळायचे आहेत. यामध्ये आशिया चषक, कसोटी अजिंक्यपद अंतिम आणि टी-२० विश्वचषक वगळण्यात आला आहे.
हेही वाचा - आता फक्त हॅमिल्टन नव्हे, तर 'सर' लुईस हॅमिल्टन
सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचे दोन सामने अद्याप बाकी असून या दौऱ्यानंतर संघ मायदेशी परतणार आहे. या महिन्यात इंग्लंडचा संघ मोठ्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. उभय संघात प्रथम ४ सामन्यांची कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
टीम इंडिया आणि २०२१ :
- जानेवारी : वर्षाची सुरुवात सिडनी कसोटीने
भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात फेब्रुवारीमध्ये इंग्लंड दौर्यापासून होईल. यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक आणि टी -२० वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. हा वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्येच भारत आयोजित करण्यात येणार आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. जेथे दोन संघांमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. वर्षाचा पहिला सामना भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी कसोटी सामन्याद्वारे खेळणार आहे. हा सामना ७ जानेवारीपासून सुरू होईल. मालिकेची शेवटची कसोटी १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये होईल.
- फेब्रुवारी ते मार्च : इंग्लंडचा भारत दौरा
इंग्लंडचा संघ फेब्रुवारीमध्ये भारताचा दौरा करेल. येथे दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी, ५ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळल्या जातील. हा दौरा ५ फेब्रुवारीपासून चेन्नई कसोटीपासून सुरू होईल. शेवटचा सामना २८ मार्च रोजी पुण्यात खेळला जाईल.
- मार्च-एप्रिल : अफगाणिस्तानचा भारत दौरा
मार्चच्या अखेरीस अफगाणिस्तान संघ भारत दौर्यावर येईल. येथे त्यांना टीम इंडियाबरोबर ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आयपीएलच्या अगदी आधी ही मालिका खेळली जाईल.
- एप्रिल-मे : आयपीएल २०२१
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४ वे सत्र एप्रिल ते मे दरम्यान खेळले जाणार आहे. मागील वर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान १३वा हंगाम कोरोनामुळे यूएईमध्ये खेळला गेला होता. यावेळी जर परिस्थिती चांगली असेल नवीन हंगामात भारतातील प्रेक्षकांचा सहभाग असू शकेल.
- जून-जुलै : भारत-श्रीलंका आणि आशिया चषक दौरा
आयपीएलनंतर टीम इंडिया श्रीलंका दौर्यावर जाईल. येथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होईल. यानंतर दोन्ही संघ श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळतील. दरम्यान, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही जूनमध्ये होणार आहे.
- जुलै : भारताचा झिम्बाब्वे दौरा
जुलैमध्ये झिम्बाब्वे दौर्यावर टीम इंडिया मर्यादित षटकांची मालिकादेखील खेळणार आहे. हा दौरा २०२० मध्ये होणार होता, परंतु कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला.
- ऑगस्ट - सप्टेंबर : भारताचा इंग्लंड दौरा
भारतीय संघ ऑगस्टमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात एका वर्षात १० कसोटी सामने खेळण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी १९८२ मध्ये दोघांमध्ये ६ कसोटी सामने खेळले गेले होते.
- ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
दक्षिण-आफ्रिका संघ टी-२० वर्ल्ड कपच्या अगदी आधी ऑक्टोबरमध्ये भारत दौर्यावर येईल. येथे दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळतील.
- ऑक्टोबर : टी -२० विश्वचषक
क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत टी-२० विश्वचषक आयोजित करेल. यापूर्वी २०१६ मध्ये भारताने टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले होते. वेस्ट इंडिजने ही स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाने फक्त एकदाच टी -२० विश्वचषक जिंकला आहे.
- नोव्हेंबर-डिसेंबर : न्यूझीलंडचा भारत दौरा
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळेल. दोन संघांत दोन कसोटी आणि तीनटी -२० सामने खेळले जातील.
- डिसेंबर : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारतीय संघ २०२१ च्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. त्या दौर्यावर टीम इंडियाला ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत.