हैदराबाद - महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून सहज विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २३७ धावांचे आव्हान भारताने ४ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार अॅरोन फिंचला भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याचा अडसर दूर केला. त्यानंतर उस्मान ख्वाजाने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याने ७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्यानंतर तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मार्कस स्टोईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीने प्रथम सामना खेळणाऱ्या अॅश्टन टर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या यष्ट्या गुल केल्या. अलेक्स केरी आणि नथन कुल्टर नाईलने भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. अॅलेक्स ३६ तर नथनने २८ धावा काढून दोनशेचा टप्पा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात ७ बाद २३६ धावा केल्या. भारताकडून शमी, बुमराह आणि यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रतिउत्तरात, भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर दुसऱ्याच षटकात शून्यवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराटने भारताचा डाव सावरला. रोहित ३७ तर विराटने ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर रोहित,विराट आणि अंबाती हे एकापोठापाठ बाद झाले. त्यामुळे ४ बाद ९९ अशी भारताची स्थिती झाली. त्यानंतर सामन्याची सारी सूत्रे महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी घेतली.
जाधवने ९ चौकारांच्या सहाय्याने ८१ धावा काढल्या. धोनीने ५९ धावा काढून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान भारतीय संघाने ४८.२ षटकात २४० धावा काढून पूर्ण केले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला.