तिरूवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडिज विरूद्ध टी-२० मालिकेतील दुसरा सामना तिरूवनंतपुरम येथील ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यातही यश मिळवून मालिका विजयाचे ध्येय टीम इंडियाचे असणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
हेही वाचा - 'भावा!.. तो फटका जबरदस्त होता', कोहलीच्या 'विराट' खेळीची पीटरसनला भूरळ
शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले २०८ धावांचे आव्हान १८.४ षटकांत पूर्ण केले होते. या विजयाबरोबरच भारताने त्यांचा टी-२० मधील सर्वोच्च धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचाही विक्रम नोंदवला होता. विराट कोहलीने नाबाद ९४, तर केएल राहुलने ६२ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात झालेल्या गचाळ क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे.
दुसरीकडे, विंडीजला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. फलंदाजीची रचना उत्तम असली, तरी मोठी धावसंख्या राखण्यात गोलंदाजांना कमालीचे अपयश आले होते. केसरिक विल्यम्स पहिल्या सामन्यात चांगलाच महागडा ठरला होता, त्यामुळे त्याला परत एकदा संधी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीजचा संघ : केरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, खॅरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.