किंग्स्टन - सध्या सुरु असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद २६४ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून विंडीजच्या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सावध सुरुवात केली होती. भारताला ३२ धावांवर राहुलच्या स्वरुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर पदार्पणवीर रकहीम कोर्नवॉलने भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला झटपट ६ धावांवर बाद करत आपला पहिला बळी मिळवला. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि मयंकने डाव सावरला. मयंकने वैयक्तिक तिसरे अर्धशतक साकारत ५५ धावा केल्या. तर कोहलीने ७६ धावा केल्या.
मागच्या कसोटी सामन्यात हिरो ठरलेला अजिंक्य रहाणे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने २४ धावा केल्या. अजिंक्यनंतर आलेल्या हनुमा विहारीने संघाचा डोलारा सांभाळला. पहिल्या दिवसअखेर ऋषभ पंत २७ तर, विहारी ४२ धावांवर खेळत आहेत. विंडीजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले.