मुंबई - भारतीय संघ बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडीजबरोबर टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची निवड २१ नोव्हेंबरला होणार असून या संघात एका नव्या खेळाडूला संधी मिळू शकते. तो नवा खेळाडू मयांक अग्रवाल ठरु शकतो.
मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्द सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी केली. यामुळे त्याला वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० किंवा एकदिवसीय मालिकेसाठी संघात संधी मिळू शकते. बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा संघ भारतात ३ एकदिवसीय आणि आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकांसाठी रोहित शर्माला विश्रांती देत निवड समिती मयांकची संधी देऊ शकते.
रोहित शर्मा मागील वर्षभर सातत्याने सामने खेळत आहे. त्यात इंडियन प्रीमिअर लीगमधील १६ सामन्यांसह ६० हून अधिक सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यालाही विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे रोहितला विश्रांती दिल्यावर मयांकची एकदिवसीय किंवा टी-२० संघात वर्णी लागू शकते असे म्हटले जात आहे.
वेस्ट इंडीज विरुध्दच्या मालिकेचे वेळापत्रक
- टी-२० मालिका
- ६ डिसेंबर - मुंबई
- ८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम
- ११ डिसेंबर - हैदराबाद
- एकदिवसीय सामन्यांची मालिका
- १५ डिसेंबर - चेन्नई
- १८ डिसेंबर- विशाखापट्टणम
- २२ डिसेंबर - कटक