मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला तिसरा आणि अखेरचा निर्णायक टी-२० सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा 'हिटमॅन' सलामी फलंदाज रोहित शर्माने आम्ही कोणत्याही संघाला घाबरत नाही, उद्या होणाऱ्या लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे सांगितले.
हैदराबाद येथील पहिला सामना भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकला. त्यानंतर वेस्ट इंडीजने दुसरा सामना लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीच्या जोरावर जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, या निकालामुळे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी आहे. त्यामुळे वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळेल, असा अंदाज आहे.
निर्णायक सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्माने सांगितलं की, 'मला इतर कोणत्याही संघांबद्दल माहिती नाही, मात्र आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही. दुसऱ्या सामन्यात विंडीजने चांगला खेळ केला. त्यामुळे ते विजयी ठरले. आमची कामगिरी चांगली झाली तर आम्ही कोणताही सामना जिंकू शकतो.'
वानखेडेच्या मैदानातील निर्णायक सामना जिंकण्यासाठी आमचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असल्याचेही रोहितने सांगितलं. दरम्यान, विंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहितला अद्याप सूर गवसलेला नाही. तो मागील दोनही सामन्यात स्वस्तात बाद झाला. यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहितला सूर गवसणे गरजेचे आहे, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.