पुणे - श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेला 202 धावांचे आव्हान दिले. मात्र, डोंगराएवढ्या मोठा आव्हानाचा पाठलाग करताना 123 धावांमध्ये श्रीलंकेचा संघ तंबूत परतला. तिसऱ्या सामन्यात भारताचा 78 धावांनी विजय झाला. भारतीय संघाने 15.5 षटकातच श्रीलंकेचा धुव्वा उडवला. भारताचा शार्दूल ठाकूर सामनावीर ठरला.
धवन, राहुलच्या अर्धशतकानंतर पांडे आणि शार्दूल चमकले
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी दमदार सलामी दिली. पण, सलग तीन षटकांमध्ये 4 फलंदाज बाद झाल्यामुळे भारतीय संघ बॅकफुटवर आला होता. संघ कोसळल्यानंतर विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी डाव सावरुन अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे भारताला 6 बाद 201 धावांपर्यंत मजल मारता आली.
शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी 10.5 षटकांमध्ये 97 धावांची आक्रमक सलामी दिली. परंतु,अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धवन बाद झाला आणि तिथुनच घसरगुंडी सुरू झाली. तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनला बढती देण्यात आली. पण, तो एक षटकार ठोकून दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर संदाकनच्या अप्रतिम गुगलीवर लोकेश राहुल यष्टीचित झाला. लोकेश राहुलने 36 चेंडुंमध्ये 52 धावा केल्या. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही दोन चेंडू खेळून परतला. विराट कोहली नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर न येता सहाव्या स्थानी फलंदाजीस उतरला. त्याने मनिष पांडेच्या साथीने डाव सावरला. अठराव्या षटकात दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. त्याने 26 धावांची खेळी केली. अखेरच्या2 षटकांमध्ये पांडेच्या साथीला आलेल्या शार्दूल ठाकूरने 8 चेंडुंमध्ये 22 धावांची झुंझार खेळी केली. पांडे आणि ठाकूर या जोडीने सातव्या विकेटसाठी 14 चेंडूंमध्ये 37 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच मधली फळी कोसळल्यानंतरही भारताला 201 धावांपर्यंत मजल मारता आली.
शिखर धवनने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर राहुलने 52 धावा केल्या. मनिष पांडेने नाबाद 31 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून संदाकन याने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने 4 षटकांमध्ये 35 धावा मोजल्या. पण, अखेरच्या षटकात दमदार कमबॅक करत त्याने धवन, राहूल आणि श्रेयस अय्यर यांना बाद केले. तर कुमार आणि डिसिल्व्हा यांनी प्रत्येकी 1 बळी टीपला.
भारताकडून नवदीप सैनीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यानंतर वाशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी दोन गडी टिपले. तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला. श्रीलंकेकडून कर्णधार लसिथ मलिंगाने दोन गडी बाद केले. अॅन्जेल मॅथ्थूज आणि लाहीरू कुमाराने प्रत्येकी एक गडी बाद केला.