विशाखापट्टणम - आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या रोहितने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले चौथे शतक झळकावले आहे. रोहितने १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. तर, मयंने १० चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी करत त्याला उत्कृष्ट साथ दिली. भारताच्या ५४ षटकांत बिनबाद १७९ धावा झाल्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या भारतीय संघाने उपाहारापर्यंत ३० षटकांमध्ये बिनबाद ९१ धावा केल्या होत्या. त्यानंतर, मात्र दोन्ही फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत धावांची गती वाढवली.
हेही वाचा - सचिन म्हणतो, 'आयुष्यात अनेक चढउतार येतात, पण 'हा' गोलंदाज संघाचा महत्वाचा भाग आहे'
आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बरोबरी राखल्यानंतर, आज भारतीय संघाने आपल्या कसोटीच्या अभियानाला सुरुवात केली. विशाखापट्टणम येथील एसीए-वीडीसीए स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या या कसोटी मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.
हेही वाचा - महिला टी-२० : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५१ धावांनी विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी
या दोन्ही संघांपैकी भारतीय संघ 'फेव्हरिट' मानला जात आहे. सर्वांच्या नजरा सलामीची संधी मिळालेल्या रोहित शर्माकडे लागल्या असून तो या सामन्यात कसा खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सराव सामन्यात रोहित अपयशी ठरला असला तरी, त्याच्याकडे सर्वांचे खास लक्ष असणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 'सुपर' असणाऱ्या रोहितला कसोटीत पहिल्यांदा सलामीला पाठवण्यात आलेे आहे.
निराशाजनक कामगिरीमुळे रिषभ पंतचा समावेश संघात होणार का याविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र, या कसोटी मालिकेत वृद्धिमान साहाच यष्टीरक्षण करणार असल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. शिवाय, फिरकीपटू रविश्चंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या खेळांडूना संघात सामील केले गेले आहे.
आफ्रिका संघाकडे रबाडा हा गोलंदाजीमध्ये प्रमुख अस्त्र आहे. तर, फलंदाजीची मदार कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकवर असणार आहे. डीन एल्गार, एडन मार्क्राम आणि टेंबा बवुमा यांचाही फंलदाजीत कस लागणार आहे.
भारतीय संघ -
मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा
दक्षिण आफ्रिकेचा संघ -
फाफ डू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.