मुंबई - बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी आऊट ऑफ फार्ममध्ये असलेल्या केएल राहुलला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी युवा शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. या मालिकेतून शुभमन गिल कसोटीमध्ये पदार्पण करणार आहे.
या मालिकेसाठी केएल राहुलला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी शुभमन गिल याची निवड करण्यात आली आहे. यामुळे रोहित शर्मा मयांक अग्रवालसोबत डावाची सुरुवात करू शकतो. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून दमदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. बीसीसीआयने यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि वृध्दीमान साहा यांना निवडले आहे.
फिरकीची मदार अनुभवी रवीचंद्रन अश्निन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. तर जलदगती गोलंदाजीचे आक्रमण मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा सांभाळतील. अष्टपैलू खेळाडू म्हणून हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही कसोटी सामन्यात आऊट ऑफ फॉर्म असणारा केएल राहुलच्या जागी रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संघात खेळवण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूचक वक्तव्य निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केले होते. यामुळे राहुल संघाबाहेर जाणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. तो अंदाज खरा ठरला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि शुभमन गिल