नवी दिल्ली - भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये तीनही प्रकारातील मालिकेत यजमान विडींजला 'व्हाइटवॉश' दिला. या दौऱ्यातील कसोटी मालिका गाजवली ती भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने. बुमराहने २ सामन्यांच्या मालिकेत तब्बल १३ गडी बाद केले. जसप्रीतच्या भन्नाट कामगिरीवर दक्षिण आफ्रिकी गोलंदाज 'फिदा' झाला असून त्याने बुमराहची स्तुती केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा याने जसप्रीत बुमराहची एका मुलाखतीत स्तुती केली आहे. रबाडा बुमराहविषयी बोलताना म्हणाला की, 'जोफ्रा आर्चरला मिळालेली प्रतिभावान गोलंदाजी ही दैवी देणगी आहे. मात्र, बुमराह हाही उत्तम गोलंदाज आहे. बुमराह गोलंदाजीत काहीही करू शकतो. तो मैदानावर जादू घडवू शकतो, अशा गोलंदाजांचे मला नेहमीच कौतुक वाटते.'
तसेच पुढे बोलताना रबाडा म्हणाला, गोलंदाजीमद्ये कारकिर्द घडवणे सोपे नसते. कारण कारकिर्दीमध्ये कायम चढ उतार होतात. प्रत्येक गोलंदाजाचे जगातील सर्वोत्तम खेळाडू व्हायचे स्वप्न असते. मात्र, तुम्हाला आंतराष्ट्रीय स्तरावर सतत स्पर्धा करावी लागले. पण मी भारत विरुध्द होणाऱ्या मालिकेबाबत किंवा कारकिर्दीबाबत चिंता करत नाही. मी फक्त खेळतो आणि पुढेही असेच मी खेळत राहणार आहे, असं रबाडानं सांगितलं.
दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोध्द दोन हात करणार आहे. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेतून यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.