वेलिंग्टन - भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग ८ व्या विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरेल. यंदा भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान आहे. अनुभवी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत विराट अॅन्ड कंपनीची धुरा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आणि स्वत: विराटवर असणार आहे. तर दुसरीकडे संघासाठी सलामीवीर जोडी चिंतेचा विषय आहे. विराटने मयांक आणि पृथ्वी शॉ सलामीला येतील, याचे संकेत दिले आहे. यामुळे शुभमन गिलचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडले आहे. इशांत शर्माची संघात वापसी झाल्याने भारतीय गोलंदाजी मजबूत झाली आहे.
असा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्ड -
कसोटीत भारताचा न्यूझीलंडविरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. दोन्ही देशात आतापर्यंत ५७ कसोटी सामने खेळली गेली आहेत. यात भारताने २० तर न्यूझीलंडने १० सामने जिंकली आहेत. तर राहिलेले २१ सामने अनिर्णीत आहेत. पण भारताचा न्यूझीलंडमध्ये खेळताना रेकॉर्ड सामन्य आहे. उभय संघात न्यूझीलंडमध्ये २४ कसोटी सामने झाले आहेत. यात भारताने ५ तर न्यूझीलंडने ८ विजय मिळवले आहेत. तर राहिलेले १० सामने अनिर्णीत आणि एक सामना रद्द झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटची कसोटी मालिका २०१७ मध्ये झाली होती. यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या कसोटी भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी वृद्धीमान साहा करु शकतो. कारण ऋषभ पंतला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. शेवटच्या डावातील अर्धशतक वगळता त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. यामुळे साहाला अंतिम संघात स्थान मिळू शकते.
भारताची मदार गोलंदाजीवर -
विराट कोहली जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या त्रिकूट वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. तर आर अश्विनकडे फिरकीची जबाबदारी असेल. अश्विनला रवींद्र जडेजाची साथ असेल. तर हनुमा विहारी कामचलाखू गोलंदाज म्हणून संघात आहे.
असा आहे भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.
असा आहे न्यूझीलंडचा संघ -
- केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लेंडल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जेमिन्सन, हेन्री निकोलस, रॉस टेलर, टॉम लाथम (यष्टीरक्षक), डेरेल मिशेल, एजाज पटेल, टिम साउदी, नील वॅग्नर(पहिल्या कसोटीतून बाहेर), बीजे वाटलिंग आणि मॅट हेन्री.