लंडन - आयसीसी विश्वकंरडक स्पर्धेमध्ये भारत विरुध्द न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड या संघात उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. या उपांत्य फेरीच्या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे, भारत पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुध्द भिडणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 44 वर्षानंतर इंग्लंडशी दोन हात करणार आहे.
या स्पर्धेत भारत विरुध्द न्यूझीलंड संघातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ 1975 सालच्या उपांत्य फेरीत समोरासमोर आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला होता.
भारत आणि न्यूझीलंड -
भारतीय संघाने सातव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. तर न्यूझीलंडच्या संघ आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघ 1983 आणि 2011 साली विश्वविजेता ठरला तर 2003 साली उपविजेता ठरला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघाला 2015 साली केवळ एकदाच अंतिम फेरी गाठता आली. त्यात ते उपविजेते ठरले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड -
ऑस्ट्रेलियाच्या संघाने आठव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर इंग्लंडचा संघ सहाव्यांदा उपांत्य फेरी खेळणार आहे. महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाने आठही वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर इंग्लंडने 1992 नंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंड संघाने तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.