मुंबई - इंग्लंड क्रिकेट संघाचे खेळाडू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स हे तिघेही आजपासून सरावला सुरूवात करतील. तिघे श्रीलंका दौऱ्यात इंग्लंड संघाचे सदस्य नव्हते. यामुळे ते इंग्लंड संघाच्या आधी तीन दिवस भारतात दाखल झाले होते.
इंग्लंड संघातील खेळाडूंना सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यादरम्यान, त्यांची तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यात निगेटिव्ह अहवाल आलेल्या खेळाडूंना सरावासाठी परवानगी दिली जाणार आहे.
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स या तिघांनी सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना आजपासून सराव करता येईल. दुसरीकडे इंग्लंडचे इतर खेळाडू आणखी काही दिवस क्वारंटाइन राहतील.
दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या दोघांना श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती दिली होती. तर रोरी बर्न्सने वैयक्तिक कारणामुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली होती.
इंग्लंड संघाचे मॅनेजर डॅनी रिबुन यांनी सांगितले की, 'स्टोक्स, आर्चर आणि बर्न्स हे तिघे दररोज दोन तास सराव करतील.'
कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे इंग्लंड संघाच्या इतर खेळाडूंना सामन्याच्या तीन दिवस आधी सरावाला परवानगी मिळणार आहे. उभय संघातील पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीला सुरूवात होणार आहे. त्याआधी इंग्लंडचे सर्व खेळाडू २ फेब्रुवारीपासून सराव सत्रात पाहायला मिळतील.
हेही वाचा - भारताचा इंग्लंड दौरा : भारताचे भारतासोबत रंगणार सराव सामने
हेही वाचा - कसोटी मालिकेत वरचढ कोण? भारत की इंग्लंड, जाणून घ्या आकडेवारी