पुणे - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये रंगला आहे. या सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ श्रेयस अय्यरला दुखापत झाली आहे.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३१७ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. इंग्लंडच्या डावातील ८व्या षटकात श्रेयस अय्यरला दुखापत झाली.
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर फलंदाजाने जोरदार फटका मारला. तेव्हा तो चेंडू अडवण्यासाठी श्रेयसने सूर मारला. यात त्याचा खांदा दुखावला गेला आहे. दुखापत झाल्यानंतर फिजिओनी तात्काळ मैदानात धाव घेतली. पण त्रास होत असल्याने अय्यरला मैदानात सोडावे लागले.
रोहितला अशी झाली दुखापत...
भारतीय फलंदाजीदरम्यान, रोहित शर्माला वेगवान गोलंदाज मार्क वूडचा चेंडू लागला. डावाच्या सहाव्या षटकात मार्क वूडचा चेंडू रोहित शर्माच्या हातावर आदळला. तेव्हा रोहितच्या हाताच्या कोपऱ्यातून रक्त येत होते. फिजिओनी धाव घेत त्यांच्यावर पट्टी लावली. रोहितने पुढेही फलंदाजी सुरू ठेवली. तो २८ धावांवर बाद झाला.
हेही वाचा - WATCH : भावाला रडताना पाहून हार्दिकच्याही डोळ्यात आलं पाणी
हेही वाचा - IND vs ENG: पदार्पणात वादळी खेळी, कृणालच्या नावे अनेक विक्रमांची नोंद