अहमदाबाद - विराट कोहली अँड कंपनीने दुसऱ्या टी-२० सामन्यात, प्रत्येक विभागात सरस कामगिरी करत इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात आक्रमक अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी करत, आपल्याला सूर गवसल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आज उभय संघात तिसरा टी-२० सामना होणार आहे.
इशान किशनने दणकेबाज खेळी केली. पण भारताचा दुसरा सलामीवीर के एल राहुलला अद्याप सूर गवसलेला नाही. विराटने कर्णधाराला साजेशी खेळी केली. अशाच खेळीची त्याच्याकडून आशा आहे. सूर्यकुमारला फलंदाजी मिळाली नाही. पण तो मोठे फटके मारण्यात सक्षम आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्यावर अखेरच्या काही षटकात वेगाने धावा जमवण्याचे आव्हान असेल. श्रेयस अय्यर देखील फॉर्मात आहे.
हिटमॅन संघात परतणार?
गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. हार्दिक पांड्याने प्रदीर्घ कालावधीनंतर चार षटके मारा केला. त्यामुळे भारताला अतिरिक्त फलंदाजासह खेळण्याचा पर्याय उपलब्ध झाला. भारतीय संघ विजयी संघात बदल करणार नाही, पण नियमित सलामीवीर रोहित शर्मा विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राहुलला संघाबाहेर जावे लागेल.
दुसरीकडे इंग्लंडचा संघ दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. शिवाय, त्यांचे गोलंदाजही दुसऱ्या टी-२० सामन्यात अपयशी ठरले. सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी धावांवर लगाम घातला. मात्र, त्यांना जास्त बळी घेण्यात अपयश आले. अशात कर्णधार इयॉन मोर्गनने मार्क वूड पुढील सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्णधार इयान मॉर्गन संघात कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विनाप्रेक्षक होणार सामना -
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नाथवानी यांनी सोमवारी जाहीर केले की, अहमदाबादसह गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पुढील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. पुढील सामन्यांची तिकीटे ज्यांनी खरेदी केली आहेत, त्यांना तिकिटाचे पैसे परत देण्यात येणार असल्याची माहितीही नाथवानी यांनी दिली. तसेच, ज्यांना कॉम्प्लिमेंटरी पास मिळाले होते, त्यांनाही या सामन्यांसाठी मैदानावर येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, ईशान किशन.
- इंग्लंडचा संघ
- इयॉन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जोर्डन, मार्क वुड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.