इंदूर - भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटू शहाबाझ नदीमला विश्रांती देत इशांत शर्माला संघात स्थान दिले आहे.
भारत-बांगलादेश कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे भारतीय संघ ही मालिका २-० ने जिंकण्याच्या उद्देशानं खेळ करेल. याच रणणितीचा भाग म्हणून कर्णधार विराटने नदीमला विश्रांती देत इशांत शर्माला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर विराट बोलताना म्हणाला, 'इंदूरच्या खेळपट्टीवर थोडेसे गवत आहे. ही खेळपट्टी पहिल्या दिवशी थोडी आक्रमक असते. यामुळं आम्ही पहिल्या दिवशी गोलंदाजी करु इच्छित नव्हतो. पण दुसऱ्या दिवसांपासून खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होईल, असा आमचा अंदाज आहे. यामुळे आम्ही ३ वेगवान गोलंदाजांना अंतिम संघात स्थान दिले आहे.'
दरम्यान, भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत २४० गुणांसह अव्वलस्थानी आहे. बांगलादेश विरुध्दची मालिका जिंकून भारतीय संघ अव्वलस्थान बळकट करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरला आहे.
हेही वाचा - चेंडू कुरतडल्याने विंडीजच्या निकोलस पूरनवर ४ सामन्यांची बंदी
हेही वाचा - संपूर्ण कारकिर्दीत भारताचा 'हा' खेळाडू माझा कट्टर प्रतिस्पर्धी होता - गिलख्रिस्ट