नागपूर - टीम इंडियाने तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात बांगलादेशचा ३० धावांनी पराभव करत ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना २० षटकात १७४ धावा केल्या. तेव्हा प्रत्त्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ निर्धारीत २० षटकात १४४ धावा करु शकला. बांगलादेशविरोधातील निर्णायक सामन्यात ५ खेळाडूंनी महत्वाची भूमिका पार पाडली वाचा कोण आहेत ते खेळाडू...
दीपक चहर -
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले. चहरने या सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी टिपले. त्याने ३.२ षटकाची गोलंदाजी करताना, ७ धावा देत ६ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, चहर टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज ठरला.

श्रेयस अय्यर -
सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने दणकेबाज खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावा झोडपल्या. विशेष म्हणजे, श्रेयसचे हे पहिलेच टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे.

केएल राहुल -
मागील काही दिवसांपासून 'ऑऊट ऑफ फॉर्म' असलेल्या केएल राहुलची बॅट निर्णायक सामन्यात तळपली. त्याने मोक्याच्या क्षणी ३५ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी साकारली. राहुल आणि अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागिदारी केली.

शिवम दुबे -
बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात शिवमने भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. शिवमने ४ षटकात ३० धावा देत ३ गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात त्याने बांगलादेश यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिमला बाद करुन पहिला टी-२० विकेट घेतला.

मनीष पांडे -
बांगलादेश विरुध्दच्या मालिकेत प्रथम अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेल्या मनीषने साजेशी खेळी केली. त्याने बांगलादेशी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आक्रमक १३ चेंडूत २२ धावा केल्या.
