सिडनी - जागतिक क्रिकेटमध्ये 'मातब्बर संघ' असे विशेषण असलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा जबर धक्का सहन करावा लागला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 'फेल' मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे शिलेदार भारतासमोर मोठ्या धावसंख्येचा बुरूज उभारू शकले. हा बुरूज भेदणे भारताला कठीण गेले. आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सिडनीच्या ओव्हल मैदानावर आज रविवारी, (२९ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) उभय संघात दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होईल.
आजच्या सामन्यात विजय नोंदवून मालिका जिंकण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल. तर, मागील सामन्याच्या चुका मागे ठेवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारत सज्ज असेल. आयपीएलची लय बाजूला सारून एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरुपाचा अवलंब करणे, हे भारतापुढे आव्हान असेल.
गोलंदाजांच्या फळीत विराट कोणता बदल करणार?
पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला होता. नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा या गोलंदाजांच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या विराटसेनेला आपली रणनिती बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत अनेक क्रीडापंडितांनी दिले आहे. त्यामुळे गोलंदाजांच्या फळीत विराट कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, आयपीएलमध्ये लक्ष वेधून घेतलेला गोलंदाज टी. नटराजन या सामन्यात खेळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्टार फलंदाजांकडे लक्ष -
टीम इंडियाकडे तळापर्यंत चांगले फलंदाज आहेत. सलामीवीर मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, विराट कोहली हे स्टार फलंदाज पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली. आता तोच फॉर्म या सामन्यातही कायम राखण्याकडे त्यांचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाची सांघिक कामगिरी -
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. पहिल्या सामन्यात कर्णधार आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी २८८ धावा ठोकल्या. त्यामुळे फिंच, वॉर्नर, मॅक्सवेल आणि स्मिथ हे फलंदाज तीच लय राखण्याचा प्रयत्न करतील. तर, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क यांना भारताच्या फलंदाजांना लवकर तंबूत पाठवण्याचे आव्हान असेल.
दोन्ही संघ -
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक).
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, डी'आर्की शॉर्ट, मार्नस लाबुशेन, अॅश्टन टर्नर, अॅश्टन एगर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पीटक हॅन्डस्कॉम्ब, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, अॅन्ड्र्यू टाय.
हेही वाचा - विराटच्या संघात खेळणार इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार?
हेही वाचा - दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला कोरोनाची लागण