मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी, भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सरावादरम्यान, जखमी झाला आहे. जर रोहितची दुखापत गंभीर असल्यास भारतासाठी हा मोठा झटका असेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. सामन्याआधी नेट प्रॅक्टिस करत असताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सराव सोडून विश्रांती करावी लागली.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सलामीवीर रोहित शर्मा मुंबईत सराव करत होता. तेव्हा चेंडू त्याच्या उजव्या अंगठ्याला लागला. त्यानंतर फिजिओ नितीन पटेल यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पण, त्यांच्या पुढील उपचाराबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सराव सत्रानंतर रोहित शर्माने एक चाहत्याला, मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला. तेव्हा रोहितला पेनसुद्धा पकडता आला नसल्याचे समजते. दरम्यान, सोशल मीडियावर ऑटोग्राफ देतानाचा रोहितचा फोटो व्हायरल झाला आहे.
असा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केदार जाधव, मनीष पांडे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल.
हेही वाचा - टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...
हेही वाचा - 'BCCI थोडी लाज वाटू द्या, केवळ दोन चेंडूवर संजूची प्रतिभा तपासली'