सिडनी - येथील शोग्राउंड स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेचा शुभारंभ केला. भारताच्या १३३ धावांचे आव्हान यजमान संघाला पेलवले नाही आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी मात दिली. कांगारूंचा संघ २० षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा करू शकला. गोलंदाजीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱया पूनम यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा - भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा क्रिकेटमधून निवृत्त
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अलिसा हेली (५१) आणि गार्डनर (३४) वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. हेलीने आपल्या खेळीत ६ चौकार आणि एक षटकार ठोकला. भारताकडून फिरकीपटू पूनम यादवने १९ धावांत ४ तर, शिखा पांडेने १४ धावांत ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. राजेश्वरी गायकवाडला १ बळी मिळाला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा केल्या. भारताच्या सलामीवीरांनी पाच षटकापर्यंत ४१ धावांची चांगली सलामी दिली. सलामीवीर शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. तिने १५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह २९ धावा टोलवल्या. स्मृतीनेही दोन चौकार लगावले. हे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या उर्वरित फलंदाजांवर अंकुश ठेवला.
कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर माघारी परतली. त्यानंतर, जेमिहा रॉड्रिगेज आणि दीप्ती शर्माने डाव सावरला. रॉड्रिगेजने २८ धावांवर बाद झाली. तर, दीप्ती ४ चौकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जोनासनने सर्वाधिक २ बळी घेतले. तर, पेरी आणि किमिन्स यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.