मुंबई - न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या (रविवार ता. १२ ) भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ५ टी-२० सामने, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही. पण दुखापतीतून बाहेर आलेल्या हार्दिक पांड्याचा संघात समावेश होऊ शकतो.
भारताच्या मुख्य संघासोबतच भारताचा अ संघ देखील न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या संघात दुखापतीतून सावरलेल्या हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली असून तो सध्या न्यूझीलंडमध्ये दोन सामने खेळणार आहे. या दोन सामन्यात हार्दिकला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. मुख्य संघात हार्दिकची निवड होऊ शकते. पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट आहे का नाही हे पाहावे लागेल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडचा दौरा महत्वपूर्ण आहे. यामुळे निवड समितीचे लक्ष विश्व करंडकाच्या दृष्टीने खेळाडूंची निवड करण्याकडे असेल. मात्र, श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील संघच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी असण्याची दाट शक्यता आहे.
एकदिवसीय संघातून केदार जाधवच्या ठिकाणी अजिंक्य रहाणेला स्थान मिळू शकतो. तर मुंबईचा सूर्यकुमार यादव याचाही पाचव्या किंवा सहाव्या स्थानासाठी विचार केला जाऊ शकतो. सुर्यकुमार आणि संजू सॅमसन दोन्ही भारताच्या अ संघात आहेत. तर कसोटी संघात बदल होण्याची शक्यता नाही.
हेही वाचा - IND VS SL : पंतच्या जागी सॅमसनला का मिळाली संधी, धवनने दिलं 'हे' उत्तर
हेही वाचा - संजू सॅमसनच्या नावे अजब रेकॉर्ड, तब्बल ५ वर्षे, ७३ सामन्यानंतर...