दुबई - क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडने प्रथमच आयसीसीचा विश्वकरंडक जिंकला. त्यानंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. आता इंग्लंडसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत इंग्लंडने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. तर भारताची दुसऱ्या क्रमाकांवर घसरण झाली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या सुधारित क्रमवारीत इंग्लंडचा संघ १२३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ १२२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर न्यूझीलंड, चौथ्या क्रमाकांवर ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमाकांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. या संघाचे अनुक्रमे ११३, ११२ आणि ११० असे गुण आहेत.
भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. तत्पूर्वी भारतीय संघाला यजमान इंग्लंडच्या संघाने ३१ धावांनी पराभव केला. याचा फटका भारताला बसला आणि क्रमवारीत घसरण झाली. दरम्यान, भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका भारताने जिंकल्यास पुन्हा भारतीय संघ अव्वल ठरेल.