लिंकन - डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदची उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारत 'अ' संघाने न्यूझीलंड दौर्यावर चांगली सुरुवात केली. लिंकन येथे रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 'अ' संघाने न्यूझीलंड 'अ' संघाचा ९२ धावांनी पराभव केला.
हेही वाचा - रणजीत 'त्रिशतक' ठोकलेल्या क्रिकेटपटूनं पंतला केलं 'रिप्लेस'
प्रथम फलंदाजी करताना भारत 'अ' संघाने ५० षटकांत आठ गडी गमावून २७९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ ४१.१ षटकांत १८७ धावांवर ढेपाळला. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवींची सुरुवात चांगली झाली. जेकब भुला (५०) आणि जॅक बॉयल (४२) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. विजय शंकरने बॉयलला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही. शेवटी यष्टीरक्षक फलंदाज डॅरेन क्लीवरने ३३ धावा केल्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताकडून खलील अहमदने ४३ धावांत ४ बळी टिपले.
तत्पूर्वी, भारत अ संघाचे फलंदाज धावा जमवण्यात यशस्वी ठरले. ऋतुराज गायकवाडने आठ चौकार आणि दोन षटकारांसह सर्वाधिक ९३ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनीही प्रत्येकी ५० धावा केल्या. खालच्या फळीत क्रुणाल पांड्याने ३१ चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ४१ धावा फटकावून संघाला मजबूत धावसंख्या दिली. न्यूझीलंडकडून गिब्सनने ५१ धावांत ४ बळी घेतले.