एंटिगा - भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्द दोन कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान, इंडीज संघाला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील पराभव जिव्हारीला लागला आहे. इंडीज कसोटी मालिकेसाठी कसून तयारीला लागला आहे. संघाला या कामी माजी खेळाडू मदत करणार आहेत.
वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार ब्रायन लारा आणि रामनरेश सरवन हे इंडीज फलंदाजांना फलंदाजीचे 'टिप्स' देणार आहेत. या विषयी बोलताना दिग्गज फलंदाज लारा म्हणाला, भारताविरुध्द होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मी आणि सरवन संघासोबत जोडले जाणार आहोत आणि १३ सदस्यीय संघाला फलंदाजीचे मार्गदर्शन करणार आहोत.
भारत विरुध्द वेस्ट इंडीज संघामध्ये पहिला कसोटी सामना २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट आणि दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. दरम्यान, कसोटी संघामध्ये अनुभवी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश संघात करण्यात आलेला नाही.