चेन्नई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात धावा करण्यावरुन स्पर्धा दिसून येईल. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.
विराट नेहमी विंडीज विरुद्ध चांगला खेळ करतो. त्याने वेस्ट इंडीज विरुद्धच्या मागील ९ एकदिवसीय सामन्यात १७४ च्या जबरदस्त सरासरीने ८७० धावा केल्या आहेत. यात ६ शतकांचा समावेश आहे.
रोहित आणि विराट यांच्यात वर्षभरात (२०१९) सर्वाधिक धावा करण्यावरुन शर्यत सुरू आहे. २०१९ या वर्षामध्ये विराटने आतापर्यंत २३ एकदिवसीय सामन्यात खेळताना ६४.४० च्या सरासरीने १२८८ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने २५ सामन्यात खेळताना ५३.५६ च्या सरासरीने १२३२ धावा जमवल्या आहेत. दरम्यान, मागील सलग दोन वर्षे विराट सर्वाधिक धावा जमवणारा खेळाडू ठरला आहे.
विराटने २०११, २०१७ आणि २०१८ या वर्षात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडीजचे डेसमंड हेंस यांनी १९८४, १९८५ आणि १९८९ या साली, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने १९९७, १९९९ आणि २००० तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने २००६, २०१२ आणि २०१४ मध्ये अशी कामगिरी केली आहे.
हेही वाचा - भारत VS वेस्ट इंडीज पहिला एकदिवसीय सामना, असा आहे 'हेड टू हेड' रेकॉर्ड
हेही वाचा - Aus vs NZ : भिरकवलेली टोपी पंचांनी हवेत झेलली, पाहा स्मिथ आणि दार यांच्यातील मजेशीर सामना