हैदराबाद - ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात फक्त एका वेगवान गोलंदाजाची जागा शिल्लक असल्याचे, कर्णधार विराट कोहलीने सांगितले. विराट वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ आगामी विश्व करंडक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. प्रत्येक जण दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आगामी विश्व करंडक स्पर्धेसाठीच्या संघाबद्दल विराटने आज महत्वाची माहिती दिली.
विराट म्हणाला, 'विश्व करंडक स्पर्धा चुरशीची होणार आहे. यात कोण बाजी मारेल हे पाहावं लागेल. आमच्याकडे भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह ही अनुभवी वेगवान जोडी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. दीपक चहरही चांगली कामगिरी करत आहे.'
मोहम्मद शमीनेही जोरदार पुनरागमन केले आहे. पण, तो टी-२० कशी कामगिरी करेल याकडे लक्ष आहे. जर टी-२० क्रिकेटमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे, हे त्याने समजून घेतले तर तो ऑस्ट्रेलियातील खेळपट्टींवर उपयुक्त ठरू शकतो. तसेच तो सध्या यॉर्करचा चांगला मारा करत असल्याचेही विराट म्हणाला.
विराट कोहलीच्या वक्तव्यावरून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचे विश्व करंडक संघातील स्थान पक्के असल्याचा तर्क लावला जात आहे.
हेही वाचा - Happy Birthday Shikhar : 'गब्बर'वर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव...!
हेही वाचा - पंत की सॅमसन, कर्णधार कोहलीने दिली 'या' नावाला पसंती