मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ मायदेशात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांची संघात वापसी झाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार असून मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर आणि शिखर धवनची संघात पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा, अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला संघात स्थान मिळालेले नाही. रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे. भारतीय निवड समितीचे नवे प्रमुख सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील प्रथमच संघाची निवड झाली आहे. जोशी यांनी काही दिवासांपूर्वीच प्रसाद यांची जागा घेतली होती.
असा आहे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला एकदिवसीय सामना - १२ मार्च धर्मशाळा
- दुसरा एकदिवसीय सामना - १५ मार्च लखनऊ
- तिसरा एकदिवसीय सामना - १८ मार्च कोलकाता
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा लाजिरवाणा पराभव
हेही वाचा - T२० World Cup Final : एलिसा हिलीने जे पुरुषाला जमलं नाही असा कारनामा केला