विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुध्द पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने, पहिल्याच दिवशी दमदार खेळ केला. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला रोहित शर्मा. रोहितने प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराची भूमिका पार पाडताना, नाबाद शतकी खेळी केली. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील ४ थे व सलीमीवीराच्या भूमिकेतील पहिलेच शतक ठरले.
हेही वाचा - INDvsSA 1st test : हिटमॅन टेस्टमध्ये पास!..झळकावले चौथे शतक
भारतीय निवड समितीने, आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत, मागील काही सामन्यात खराब कामगिरी केलेल्या केएल राहुलच्या ठिकाणी रोहित शर्माला संधी दिली. तेव्हा कर्णधार विराटनेही, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्मावर विश्वास दाखवला आणि त्याला प्रोत्साहन दिले. निवड समिती आणि कर्णधार कोहलीचा विश्वास रोहितने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात खणखणीत शतक ठोकून सार्थ करुन दाखवला. रोहितने शतकी खेळी करत अनेक ऐतिकासिक रेकॉर्ड केले.
रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. तसेच मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ डावात ५० हून अधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड पहिल्या क्रमांकावर असून त्याने १९९७-९८ या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा ५० हून अधिक धावा केल्या होत्या.
हेही वाचा - स्टार्कच्या बायकोचा विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद १४८ धावा!