पुणे - विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी विजय मिळवला. या विजयात कर्णधार कोहली आणि भारतीय गोलंदाज हिरो ठरले. भारताने प्रथम पहिल्या डावात कोहलीच्या नाबाद २५४ धावांच्या जोरावर ६०१ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर गोलंदाजांनी आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर गुंडाळला. तेव्हा कर्णधार कोहलीने फॉलोऑन लादला आणि गोलंदाजांनी आफ्रिकेचा दुसऱ्या डाव १८९ धावात गुंडाळत विजयावर शिक्कमोर्तब केले.
भारताने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. पुण्याच्या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या एका सामन्यात कर्णधार कोहलीने भारताच्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
दरम्यान, टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा डावाने विजय मिळवला आहे. या कामगिरीसह कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याने सौरव गांगुलीचा विक्रम मोडताना संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत भारताचा महेंद्रसिंह धोनी अव्वलस्थानी असून त्याने भारताला ९ सामन्यात डावाने विजय मिळवून दिला आहे.
हेही वाचा - टीम इंडियाने जिंकली पुणे कसोटी, आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात
हेही वाचा - भारत-आफ्रिका कसोटीमध्ये तब्बल ११ वर्षांनी घडली 'ही' गोष्ट