अहमदाबाद - भारतीय संघान नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० मालिकेत बरोबरी साधली. इंग्लंडविरुद्धच्या दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या इशान किशनने दमदार अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी नाबाद खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण सामन्यादरम्यानची एक चूक भारतीय संघाला महागात पडली.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने स्लो ओव्हर रेटने गोलंदाजी केली. या कारणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय संघाला शिक्षा सुनावली आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम, दंड म्हणून कापण्यात येणार आहे.
दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात, भारतीय संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने सलामीला येत ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची दमदार खेळी केली. यानंतर विराटने नाबाद ७३ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघातील तिसरा सामना १६ तारखेला होणार आहे.
हेही वाचा - Just Married: जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी आयसीसीसह क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव
हेही वाचा - इशानच्या दमदार खेळीत आहे रोहितचा वाटा; खुद्द किशनने केलं कबूल