अहमदाबाद - चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताच्या अक्षर-अश्विन-सुंदर या फिरकी तिकडीने इंग्लंडचे ८ गडी बाद केले. तर सिराजने दोन गडी टिपले. बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. दरम्यान, भारताने पहिल्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली आहे.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. अक्षर पटेल याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ले (२) याला त्रिफळाचीत केले. सिब्लेच्या पाठोपाठ अक्षरने जॅक क्राउली याला बाद केले. त्याने क्राउलीला सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले. क्रॉउलीने ९ धावा केल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सिराजने रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला जबर धक्का दिला. तेव्हा इंग्लंडची अवस्था ३ बाद ३० अशी झाली.
जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या जोडीने चिवट खेळी करत पडझड रोखली. उपहारापर्यंत इंग्लंडने ३ बाद ७४ धावा केल्या. उपहारानंतर जॉनी बेयरस्टो (२८) बाद झाला. त्याला सिराजने पायचित केले. तेव्हा स्टोक्सने ओली पोपसमवेत जोडी जमवत इंग्लंडला शंभरी गाठून दिली. यादरम्यान, स्टोक्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्सचा अडथळा वॉशिग्टन सुंदरने दूर केला. सुंदरने त्याला ५५ धावांवर पायचित केले.
तिसऱ्या सत्राच्या आधीच ५ विकेट्स गमावल्यानंतर ओली पोप आणि डॅनियम लॉरेन्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी ६व्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. पण अखेर अश्विनने ओली पोपला ६२ व्या षटकात शुबमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. पोपने ८७ चेंडूत २९ धावा केल्या. यानंतर अश्विनने ६६ व्या षटकात यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सला बाद केले आणि इंग्लंडला सातवा धक्का दिला. फोक्स केवळ १ धाव करुन बाद झाला. एका बाजूने विकेट जात असताना, दुसरी बाजू डॅनियल लॉरेन्सने पकडून ठेवली. तो ४६ धावांवर खेळत असताना त्याला अक्षर पटेलने बाद केले. यानंतर डोम बेस (३) आणि जॅक लीच (७) देखील स्वस्तात बाद झाले. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतले. तर अश्विनने ३ गडी बाद केले. सिराजने २ तर सुंदरने एक गडी टिपला.