अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपुढे इंग्लंडच्या संघाने लोटांगण घातलं. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. फिरकीपटू अक्षर पटेलने ३८ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. या कामगिरीसह अक्षरने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
अक्षर पटेल आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरा सामना खेळत आहे. त्याने चेन्नईला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करताना दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करताना तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी असा विक्रम केवळ मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी यांनी केला होता.
निसार यांनी १९३२ साली लॉर्ड्स येथे पदार्पण करताना पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यानंतर त्यांनी १९३३ साली मुंबई येथे दुसरा कसोटी सामना खेळताना पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.
हिरवाणी यांनी १९८८ साली चेन्नई येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला. यात त्यांनी दोन्ही डावात प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरु येथे दुसरा सामना खेळताना त्यांनी दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
अक्षरला अनुभवी रविचंद्रन अश्विनची साथ लाभली. अश्विनने ३ गडी बाद केले. तर १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांतला एक गडी टिपता आला.
हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती, 'गल्ली बॉय' अक्षरचे ६ बळी
हेही वाचा - न्यूजीलंड महिला क्रिकेट संघाची गोलंदाज ताहुहुला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या ODI मालिकेतून बाहेर