कोलकाता - बांगलादेशचा संघ भारत दौरा आटपून मायदेशी परतला आहे. मात्र, बांगलादेशचा राखीव सलामी फलंदाज सैफ हसन हा भारतात अडकला आहे. सैफचा व्हिसा संपल्याने त्याला कोलकाता विमानतळावर रोखण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणात त्याला २१,६०० रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.
कोलकातामध्ये भारत आणि बांगलादेश संघात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्याची सुरुवात २२ नोव्हेंबरला झाली आणि २४ नोव्हेंबरच्या पहिल्या सत्रात हा सामना संपला. याच दिवशी सैफ हसनचा व्हिसा संपला.
बांगलादेशचा संघ २५ नोव्हेंबरला मायदेशी रवाना होण्यासाठी निघाला. तेव्हा संघासोबत सैफ हसनही होता. मात्र, त्याचा ६ महिन्यांसाठी असलेला व्हिसा २४ तारखेला संपल्याचे तपासणीत दिसून आले. तेव्हा त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी बांगलादेशला जाण्यापासून रोखलं. मात्र, सैफ सोडून सर्व संघ बांगलादेशला रवाना झाला.
सैफचा व्हिसा २४ नोव्हेंबरला संपल्याने त्याला २१,६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सैफला बांगलादेशला रवाना होण्यासाठी परवानगी मिळाली.
हेही वाचा - निवृत्ती की पुनरागमन..! महेंद्रसिंह धोनी म्हणाला...
हेही वाचा - मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश
हेही वाचा - IND VS WI : दुखापतीमुळे शिखर धवन संघातून आऊट, 'या' खेळाडूला संधी