बंगळुरू - टीम इंडियाने रविवारी निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्याची मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा स्टिव्ह स्मिथचे शतक (१३२ चेंडूत १३१) आणि मार्नस लाबुशेनच्या अर्धशतकाच्या (६४ चेंडूत ५४) जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २८७ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाचे हे लक्ष्य टीम इंडियाने ४७.३ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. भारताच्या विजयात या खेळाडूंनी मोलाची भूमिका निभावली. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
रोहित शर्मा -
ऑस्ट्रेलियाच्या २८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, टीम इंडियाची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली. दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने एक बाजू पकडून जबाबदारीने खेळ केला आणि शतक झळकावले. त्याने या सामन्यात १२८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारासह ११९ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, रोहितचे हे कारकिर्दीतील २९ वे शतक ठरले.
विराट कोहली -
केएल राहुल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने रोहितला चांगली साथ दिली. दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. विराट या सामन्यात शतक ठोकण्यात अयशस्वी ठरला. त्याने या सामन्यात ९१ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ८९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. रोहित-विराट या जोडीने तिसऱ्या गडीसाठी १३७ धावांची भागिदारी केली. तीन सामन्याच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्याने विराटला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
श्रेयस अय्यर -
चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयसने शानदार फलंदाजी केली. त्याने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४४ धावा झोडपल्या. अय्यरने विराटसोबत ६८ धावांची भागिदारी रचली.
मोहम्मद शमी -
मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. शमीने या सामन्यात १० षटकात ६३ धाव देत ४ गडी टिपले.
रवींद्र जडेजा -
सर रवींद्र जडेजा या नावाने ओळखला जाणारा जड्डूने या सामन्यात १० षटके गोलंदाजी केली. यात त्याने ऑस्ट्रेलियाचे २ गडी बाद केले.
हेही वाचा - मी बुमराहसारखी गोलंदाजी करतो, चाहत्याची भरमैदानात पोस्टरबाजी; ICC म्हणाली, पुरावा दे !
हेही वाचा - India vs Australia : चिन्नास्वामीवर कांगारू पराभूत, भारताने २-१ ने जिंकली एकदिवसीय मालिका