चेन्नई - इंग्लंड संघाने चेन्नई कसोटीत भारताचा २२७ धावांनी पराभव करत ४ सामन्याचा मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या मानहानिकारक पराभवावर संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, 'आम्ही सामन्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. असे असले तरी, वेगवान गोलंदाज तसेच रविचंद्रन अश्विन याने चांगली कामगिरी केली. पण आम्ही धावा रोखून इंग्लंडवर दडपण निर्माण करू शकलो असतो.'
चेन्नईची खेळपट्टी संथ होती. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज सतत स्ट्राईक बदलत होते आणि सामन्यावर पकड घेत होते, असे देखील विराट म्हणाला.
पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून काहीच मदत मिळाली नाही. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. त्यांचे श्रेय हिसकावून घ्यायचे नाही. त्यांनी चतुर खेळ केला. आमची देहबोली आणि जिंकण्यासाठीची तीव्रता कमी पडली. याउलट इंग्लंडने अधिक प्रोफेशनली खेळ केला, असेही विराटने सांगितले.
पहिल्या डावात मधल्या फळीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. परंतु आघाडीच्या चार फलंदाजांनी निराश केले. याचा विचार करायला हवा आणि सुधारणा करायला हवी. दुसरीकडे इंग्लंडच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली, असे सांगत विराटने इंग्लंडच्या फलंदाजीचे कौतूक केले. दरम्यान, इंग्लंड-भारत यांच्यातील दुसरा सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच होणार आहे.
हेही वाचा - पहिली कसोटी पाहुण्यांची, इंग्लंडचा भारतावर 'मोठा' विजय
हेही वाचा - Ind vs Eng : जेम्स अँडरसनचा 'तो' भन्नाट स्पेल अन् भारताच्या पराभवाची झाली पायाभरणी