मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. आता त्याने, पाकिस्तानचा माजी फलंदाज इम्रान नजीर हा सेहवागपेक्षा अधिक प्रतिभाशाली खेळाडू असल्याचा दावा केला आहे.
रावळपिंडी एक्स्प्रेस या नावाने ओळखला जाणाऱ्या शोएबच्या मते, इम्रान नजीरमध्ये सेहवागपेक्षा अधिक प्रतिभा होती. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नजीरवर विश्वास दाखवला नाही. जर विश्वास दाखवला असता तर तो सेहवागपेक्षा चांगला फलंदाज ठरला असता. अख्तरने एका टीव्ही शोमध्ये त्याचे मत व्यक्त केले.
शोएब म्हणाला, 'पाकिस्तान बोर्डाला चांगले खेळाडू जपायचे जमले नाही. त्याच्या प्रतिभेचा वापर कसा करावा, हे कळलं नाही. ही दुर्दैवी बाब आहे. इम्रान नजीर प्रतिभावान सलामीवीर होता. त्याच्या खेळीकडे नीट लक्ष देण्याची गरज होती. नजीर चांगला फलंदाज होता. तो क्षेत्ररक्षणातही चपळ होता.'
पुढे तो म्हणाला,, 'जावेद मियाँदाद यांनी नझीरला खूप मदत केली. मियाँदाद यांच्यामुळेच नझीर चांगली कामगिरी करू शकला. ते त्याला प्रोत्साहन देत असत. त्याची कामगिरी खराब झाली, तर मियाँदाद त्याला मॅसेज पाठवून चुकीची जाणीव करून देत होते.'
दरम्यान, नझीरने ८ कसोटी, ७९ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याने अनुक्रमे ४२७, १८९५ आणि ५०० धावा केल्या आहेत. विरेंद्र सेहवागने १०४ कसोटीत ८५८६, २५१ एकदिवसीय सामन्यात ८२७३ आणि १९ टी-२० मध्ये ३९४ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - कोरोनाही 'या' हेअरकटमुळे कन्फ्यूझ होईल, हरभजनने शेअर केला फोटो
हेही वाचा - अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय खेळाडूची निवड