दुबई - भारतीय संघाने चेन्नई येथील दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकत चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळाले. भारतीय संघाने यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. पण दुसऱ्या कसोटीत पराभवाची परतफेड करत भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. दुसरीकडे पराभवाचा फटका इंग्लंड संघाला बसला आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन थेट चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार, न्यूझीलंडचा संघ ७० टक्के विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे. चौथ्या स्थानावर घसरलेल्या इंग्लंड संघाची विजयाची टक्केवारी ६७ इतकी आहे.
हेही वाचा - आयपीएलमध्ये 'या' संघासोबत खेळण्याची मॅक्सवेलची इच्छा
हेही वाचा -पराभवाचा वचपा..! भारताचा इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजय