मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील 'हायहोल्टेज' सामना भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. या सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या शिखर धवनच्या जागी अष्टपैलू विजय शंकर याला स्थान देण्यात आले आहे. पावसाच्या अंदाजामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली याला देखील प्रथम गोलंदाजीचा निर्णय घ्यायचा होता मात्र, पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर असलेल्या शिखर धवन याची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तेव्हा आज शिखरच्या ठिकाणी अष्टपैलू विजय शंकरला अंतिम ११ मध्ये जागा देण्यात आली. यानिर्णयाबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, विजय शंकर हा प्रतिभावान खेळाडू आहे. शंकर याच्यामुळे फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याची मदत होऊ शकते. त्यानं आधी चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळं त्याला अंतिम ११ मध्ये जागा देण्यात आली असं त्यांन सांगितलं.
विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली होती. पण तिसरा सामना पावसामुळे वाया गेला आहे. आज भारत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुध्द सामना खेळत आहे.