दुबई - कोरोनामुळे पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारी महिलांची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, २०२१ मध्ये होणारी पुरूषांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात तर, २०२२ मध्ये होणारी पुरूषांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.
कोरोनाचे जगभरातील आरोग्य, क्रिकेट आणि व्यावसायिक परिणाम लक्षात घेऊन व्यापक अभ्यासानंतर आयबीसीने (आयसीसीची व्यावसायिक सहाय्यक कंपनी) हा निर्णय घेतला आहे, असे आयसीसीने सांगितले. आयसीसीचे कार्यकारी अध्यक्ष इमरान ख्वाजा म्हणाले, ''गेल्या काही महिन्यांत आम्ही जागतिक कार्यक्रम कसे आयोजित करतो यावर विचार करत आहोत."
ते म्हणाले, "बोर्डाने घेतलेला निर्णय खेळाच्या, आमच्या भागीदारांच्या आणि विशेष म्हणजे आमच्या चाहत्यांच्या हिताचा आहे. मी बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट न्यूझीलंडमधील माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. आयसीसीच्या स्पर्धांच्या पुनरागमनासाठीस मला त्यांच्या कटिबद्धतेबद्दल आभार मानायचे आहेत."