लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द बांगलादेशचा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळले असून त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. दिनेश कार्तिक हा बांगलादेश संघासाठी निदहास करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्दनकाळ ठरला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइटरायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या दिनेश कार्तिकने मधल्या फळीत अनेकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तसेच त्याने गतवर्षी १८ मार्च २०१८ रोजी झालेली निदहास करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. त्याने या सामन्यात अवघ्या ८ चेंडूत २९ धावा कुटल्या होत्या.
विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचे फलंदाज ही डोकेदुखी ठरले आहेत. त्यामुळे संघाची मधली फळी कमकुवत बनली आहे. अशा परिस्थितीत मधल्या फळीत संघाला स्थैर्य देण्यासाठी दिनेश कार्तिकला संघात परत बोलवण्यात आले आहे.